मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खासदार फुटल्यानंतर ठाकरे गटाला आता दुसरा एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या आठ दिवसांत उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा बॅकफूटवर आणले आहे. ठाकरे कुटुंबाचे अत्यंत निकटवर्तीय आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी कठीण काळात उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिंदे गटात प्रवेश करताच सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी वर्णी लागल्याचीही माहिती आहे.
आदित्य ठाकरेंची ‘सावली’ मानले जायचे सचिन अहिर
सचिन अहिर हे वरळीचे माजी आमदार असून, सध्याचे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासोबत ते नेहमी सावलीसारखे वावरताना दिसायचे. ठाकरे गटाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विधान परिषदेवर पाठवले होते. मात्र, राज्यात सुरू असलेल्या पक्षांतराच्या लाटेत त्यांनी अखेर उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला.
कामगार नेता ते शिवसेना प्रवेश: सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास
सचिन अहिर यांची मूळ राजकीय कारकीर्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सुरू झाली. शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय प्रवासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. राष्ट्रवादीने त्यांना मंत्रिपद आणि मुंबई अध्यक्षपदासारख्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या.
दक्षिण मुंबईतील ‘गिरणगाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिल कामगारांच्या युनियनच्या माध्यमातून सचिन अहिर यांनी कामगार क्षेत्रातून राजकारणात पाऊल ठेवले होते.
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचे भाचे म्हणूनही त्यांची ओळख राहिलेली आहे. पुढे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला होता.
लोकसभा खासदारांच्या बंडखोरीनंतर आता मुंबईतील एक महत्त्वाचा आणि विश्वासू चेहरा गमावल्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा अतिशय मोठा राजकीय फटका मानला जात आहे.
