• Mon. Jun 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नसरापूर केसमध्ये दोषी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

ByEditor

Jun 29, 2026

🔴 पुणे विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

🔴 गुन्ह्यापासून शिक्षेपर्यंतचा प्रवास अवघ्या ५५ दिवसांत पूर्ण

🔴 ६५ वर्षीय नराधमाची सुधारण्याची पातळी संपली; न्यायालयाने नोंदवले निरीक्षण

पुणे (प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय भीमराव प्रभाकर कांबळे याला पुण्यातील शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी हा निकाल देताना, “हे दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण असून आरोपी सुधारण्याच्या पलीकडे गेला आहे,” अशा तीव्र शब्दांत नराधमावर ताशेरे ओढले. या संवेदनशील खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी पीडितेचे कुटुंबीय आणि नागरिकांनी न्यायालयात मोठी गर्दी केली होती.

‘क्रूरतेचा कळस; फाशीही अपुरी पडेल’

१ मे २०२६ रोजी घडलेल्या या नृशंस घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अंतिम निकालवाचन करताना न्यायमूर्ती एस. आर. साळुंके यांनी आरोपीच्या क्रूरतेवर बोट ठेवले. ते म्हणाले, “आरोपीने चिमुरडी जिवंत राहील असा पर्यायच ठेवला नव्हता. हत्येनंतरही त्याने अत्याचार सुरू ठेवल्याचे शवविच्छेदन अहवालातून सिद्ध झाले आहे. या नराधमाला आजन्म कारावास काय, तर फाशीची शिक्षाही अपुरी पडेल.” आरोपीचे वय ६५ वर्षे असले तरी या वयातही त्याची वासना कायम असल्याने त्याला वयाची कोणतीही सवलत किंवा दया दाखवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

गुन्हेगारी पार्श्वभूमी ठरली कारणीभूत

न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेच्या गुन्हेगारी इतिहासाचा प्रामुख्याने उल्लेख केला. यापूर्वी वयाच्या ५३ व्या वर्षी त्याने स्वतःच्या कुटुंबातील एका मुलीवर अत्याचार केला होता, तसेच एका वृद्ध महिलेवरही जीवघेणा हल्ला केला होता. “गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळेच त्याला कायद्याची भीती नव्हती. आपण वाचू, या खात्रीनेच त्याने हे कृत्य शांत डोक्याने आणि कट रचून केले,” असे न्यायालयाने नमूद केले.

५५ दिवसांत न्याय! पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

देशात खून आणि अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणात घटनेपासून शिक्षेपर्यंतचा प्रवास अवघ्या ५५ दिवसांत पूर्ण होण्याची ही दुसरीच घटना ठरली आहे.

  • पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १६ दिवसांत तपास पूर्ण करत १,२०० पानांचे दोषारोपपत्र (Charge sheet) न्यायालयात सादर केले.
  • सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे आणि तांत्रिक बाबींच्या आधारे तपास यंत्रणेने गुन्ह्याचे सर्व दुवे अचूक जोडले.
  • विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचे दाखले देत आरोपीला फाशी देण्याची केलेली मागणी न्यायालयाने ग्राह्य धरली.

उत्कृष्ट तपासाबद्दल न्यायालयाने पोलीस दल, सरकारी वकील, डॉक्टर आणि सायबर-फॉरेन्सिक टीमचे जाहीर कौतुक केले.

पीडित कुटुंबाचा कायद्यावरील विश्वास सार्थ घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी मुंबई-बेंगळुरू हायवे रोखून धरत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली होती. “समाजातील तीव्र प्रतिक्रियांची आम्हाला जाणीव आहे, मात्र न्यायालय कायद्यानुसार चालते. या निकालामुळे पीडित कुटुंबाचा आणि समाजाचा कायद्यावरील विश्वास अधिक दृढ होईल,” असा विश्वास न्यायालयाने व्यक्त केला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!