रत्नागिरी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील १९ तरुणांचा ग्रुप रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेला होता. मात्र, येथे एका भीषण दुर्घटनेत ५ तरुणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे, तर तिघांना सुखरूप वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे.
बिडकीन येथून तीन दिवसांपूर्वी या मुलांनी ट्रीप काढली होती. आज रत्नागिरी येथे पोहोचल्यानंतर समुद्राचे पाणी पाहून काही तरुणांना पोहण्याचा मोह आवरला नाही आणि ते पाण्यात उतरले. मात्र, समुद्राच्या पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने अचानक ८ तरुण समुद्रात वेगाने ओढले गेले. हा प्रकार किनाऱ्यावर असलेल्या त्यांच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली.
पाच तरुणांचा बुडून दुर्दैवी अंत
या दुर्घटनेत आदित्य संतोष राऊत (वय २२), अनिकेत बंडू हिवराळे (वय २०), आनंद राजू नरवडे (वय २०), प्रेम दीपक आदमाने (वय १९) आणि यश रामेश्वर कांबळे या पाच तरुणांचा समुद्रात बुडून अंत झाला. हे सर्व तरुण अवघ्या १८ ते २२ वयोगटातील होते. दुपारी ही बातमी बिडकीन गावात धडकताच संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
पोलीस अधीक्षकांकडून शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी तातडीने गणपतीपुळे येथे धाव घेतली. समुद्रात बुडालेल्या तरुणांच्या शोधासाठी पोलीस अधीक्षकांनी स्वतः बचाव पथकासोबत समुद्रात उतरून शोधकार्यात सहभाग घेतला. या मोहिमेत तिघांना सुरक्षितपणे पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले असून, उर्वरित तरुणांचे मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
