• Wed. Jul 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रत्नागिरीत २६ वा कबड्डी दिन उत्साहात साजरा; विविध राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण

ByEditor

Jul 22, 2026

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी)
स्वर्गीय शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिन आणि २६ व्या राज्य कबड्डी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने विशेष पुरस्कार वितरण सोहळा १५ जुलै रोजी उत्साहात पार पडला. माळनाका येथील देसाई बँक्वेट हॉलमध्ये आयोजित या सोहळ्यात क्रीडा, पत्रकारिता आणि संघटन क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. उदय सामंत, सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, आमदार भाई जगताप, आमदार किरण उर्फ भैय्या सामंत, असोसिएशनचे अध्यक्ष/कार्याध्यक्ष गजानन कीर्तीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान:

  • जीवन गौरव पुरस्कार: सांगलीचे दिनकर पाटील आणि पुण्याच्या शकुंतला खटावकर यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
  • पत्रकारिता पुरस्कार: क्रीडा पत्रकार मंगेश वरवडेकर आणि दै. ‘सकाळ’चे अल्ताफ कडकाले यांना ‘ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने’ गौरविण्यात आले.
  • रत्नागिरीतील पुरस्कारार्थी: रत्नागिरीतील सदानंद जोशी (कृतज्ञता पुरस्कार), सुरज राठोड (उदयोन्मुख पुरस्कार) आणि विलास सावंत (उत्कृष्ट पंच) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

तसेच विविध विभागांतून खेळाडू, पंच, श्रमयोगी कार्यकर्ते आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये किशोर, किशोरी, कुमार आणि कुमारी गटातील अनेक गुणवंत कबड्डीपटूंना शिष्यवृत्ती पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

‘कोणावरही अन्याय होऊ देणार नाही’ — उदय सामंत

आपल्या भाषणात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी कबड्डी खेळाडू, पंच व कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव करत, “क्रीडा क्षेत्रातील पंच, खेळाडू किंवा घटकांवर कधीही अन्याय होऊ दिला जाणार नाही,” अशी ग्वाही दिली.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, असोसिएशनचे प्र. सहकार्यवाह माधव गायकवाड, खजिनदार मंगल पांडे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह नितीन बांद्रे तसेच चक्रभेदी सोशल फाऊंडेशन (देवरुख) च्या वैदेही सुधीर सावंत यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. वैदेही सावंत यांनी सर्व पुरस्कारप्राप्त गुणवंतांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सुधीर सावंत यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!