• Mon. May 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दहावीचा निकाल ९२.९ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी, कोकण विभाग अव्वल

ByEditor

May 8, 2026

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. राज्याचा एकूण निकाल ९२.९ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात २.०१ टक्क्यांची घट झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रनजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्यासह विविध शिक्षण संचालक उपस्थित होते. नऊ विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने ९७.६२ टक्क्यांसह निकालात आपले पहिले स्थान कायम राखले आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (८८.४१ टक्के) लागला आहे.

यंदाच्या निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. ९४.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.५६ टक्के इतके आहे. राजभरातून एकूण १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, यंदाची परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवण्यात आले होते. यासाठी २७१ भरारी पथके आणि महिलांची विशेष पथके तैनात करण्यात आली होती. एकूण आठ माध्यमांमध्ये ही परीक्षा पार पडली.

‘निकाल लवकर जाहीर झाल्यामुळे आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू करणे शक्य होणार आहे. जे विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावा,’ असे आवाहनही कुलकर्णी यांनी या वेळी केले. बारावीच्या निकालापाठोपाठ दहावीच्या निकालातही यंदा घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!