जळगाव (वृत्तसंस्था) : महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे स्वीय सहाय्यक राजेश गायकवाड यांच्यावर जातीय अपमान, धमकावणे आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप झाल्यामुळे मंत्रालयासह प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव दक्षिणचे बाल विकास प्रकल्प अधिकारी आर. आर. तडवी यांनी ‘महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटने’कडे याप्रकरणी लेखी तक्रार केली असून गायकवाड यांच्याविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे.
आर. आर. तडवी यांनी आपल्या तक्रारीत प्रशासकीय बदल्यांमध्ये आपल्याला हेतुपरस्सर लक्ष्य केले गेल्याचे नमूद केले आहे. सन २०२१ मधील सर्वसाधारण बदली प्रक्रियेदरम्यान जळगाव येथे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पद रिक्त असतानाही त्यांना डावलून बीड येथे बदलण्यात आले. आपण ‘तडवी भिल्ल’ या आदिवासी समाजाचे असल्यामुळेच आपल्याला अपमानित करण्यासाठी ही बदली करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यानंतर सन २०२४ च्या बदल्यांमध्येही जळगाव जिल्हा परिषदेतील जिल्हा कार्यक्रम अधिकारी पद रिक्त असूनही त्यांच्या विनंती अर्जाकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि सेवाज्येष्ठतेचा नियम डावलून स्वतःपेक्षा १० वर्षे कनिष्ठ असलेल्या अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती करण्यात आली.
जातीय मानसिकतेतून वारंवार अन्याय होत असल्याचा आरोप करताना तडवी यांनी स्वीय सहाय्यकांवर गंभीर आरोप केले आहेत. बदलीच्या कामासाठी मंत्रालयात गेल्यानंतर राजेश गायकवाड यांनी सार्वजनिक ठिकाणी आपला अपमान केला, तसेच “गुपचूप नोकरी कर, नाहीतर तात्काळ निलंबित करीन,” अशी धमकी देऊन दबाव टाकल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या संवेदनशील प्रकरणामुळे महिला व बाल विकास विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात तीव्र अस्वस्थता पसरली आहे. जातीय छळवणुकीचे स्वरूप पाहता या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता अधिकारी संघटनेकडून केली जात आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप शासन किंवा संबंधित मंत्र्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
