शशिकांत मोरे
धाटाव : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रोहा-कोलाड मार्गावरील सुदर्शन कॉलनीसमोर आज सायंकाळी ६:१५ च्या सुमारास एक मोठे वडाचे झाड अचानक मुख्य रस्त्यावर उन्मळून पडले. सुदैवाने, झाड पडले त्या क्षणी रस्त्यावरून कोणतेही वाहन जात नसल्याने एक मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, झाडाचा विस्तार मोठा असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांची गैरसोय
हा मार्ग मुख्य वाहतुकीचा असल्याने दुर्घटना घडताच रोहा आणि कोलाड या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यामध्ये एसटी बसेस, खाजगी वाहने आणि मालवाहू ट्रक अडकून पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सायंकाळची वेळ असल्याने कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांना आणि प्रवाशांना याचा मोठा फटका बसला.
प्रशासन घटनास्थळी; युद्धपातळीवर काम सुरू
घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी, पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावरील झाड लवकरात लवकर हटवण्यासाठी प्रशासनाने कटर मशीन आणि जेसीबी पाचारण केले आहे. सध्या युद्धपातळीवर झाडाच्या मोठ्या फांद्या कापून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.
पर्यायी मार्गाचा वापर आणि प्रशासनाचे आवाहन
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने काही हलकी वाहने पर्यायी मार्गाने वळवली असून, वाहनधारकांना धीर धरण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. रस्ता पूर्णपणे साफ करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.
