नवी दिल्ली, ता. १४ : शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाच्या मालकीच्या मुद्द्यावर दीर्घकाळापासून सुरू असलेला कायदेशीर संघर्ष अखेर निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत आहे. आज सर्वोच्च न्यायालयात न्या. सूर्यकांत व न्या. बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यामध्ये ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल तर शिंदे गटाकडून मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद सादर केला.
सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाच्या अर्जाचा विचार करत स्पष्ट केले की आता मुख्य याचिकेवर सुनावणी होणार असून पुढील अर्ज घेण्यात येणार नाहीत. सुनावणीसाठी ऑगस्टमध्ये तारीख निश्चित केली जाणार असून पुढील २-३ दिवसांत वेळापत्रक निश्चित होईल, अशी माहिती देण्यात आली.
ठाकरे गटाने मागणी केली होती की, राष्ट्रवादी काँग्रेसप्रकरणात कोर्टाने दिलेल्या तात्पुरत्या आदेशाच्या आधारे धनुष्यबाण चिन्हाच्या बाबतीतही तात्पुरता दिलासा द्यावा. यावर शिंदे गटाकडून जोरदार विरोध करण्यात आला.
वकील सिद्धार्थ शिंदे यांनी माहिती दिली की, ऑगस्टमध्ये सुनावणी झाल्यास या प्रकरणाचा निकाल सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान लागण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निकाल लागल्यास ठाकरे गटासाठी ही दिलासादायक बाब ठरू शकते.
सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीत दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा संकेत दिला आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळणार की एकनाथ शिंदे यांच्याकडेच कायम राहणार, हे या वर्षाअखेरीस स्पष्ट होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आता पुढील राजकीय घडामोडी आणि मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाचा ‘कौल’ मिळतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.