सलीम शेख
माणगाव : तळाशेत केंद्रातील उपक्रमशील जिल्हा परिषदेच्या कोल्हाण येथील शाळेत दि. 14 जुलै रोजी हस्ताक्षर व सुलेखन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस मार्गदर्शन सुप्रसिद्ध सुलेखनकार चंदन तोडणकर यांनी केले. कार्यशाळेस शाळेतील आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. तोडणकर यांनी दोन्ही हातांनी लेखन, उजवीकडून डावीकडे लिहिण्याची कला, तसेच बाटलीतील कलाकुसर यासारख्या विविध तंत्रांची माहिती देत उपस्थितांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यशाळेला शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ विनायक वाढवळ हे विशेष उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वी नियोजन शाळेचे शिक्षक कुंडे सर व शाळा व्यवस्थापन समितीने केले. कार्यक्रमाचे सुरेख आणि ओघवते सूत्रसंचालन अशोक रामभाऊ आव्हाड यांनी केले
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये हस्ताक्षर आणि सुलेखनाबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला असून अशा कार्यशाळा वारंवार घडाव्यात, अशी विद्यार्थ्यांची आणि पालकांची भावना होती.
