• Sat. Mar 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जेएनपीए बंदरात विदेशी सिगारेट सिंडिकेटचा पर्दाफाश – डीआरआयची १३.१८ कोटींची कारवाई

ByEditor

Jul 19, 2025

घन:श्याम कडू
उरण :
न्हावा-शेवा (जेएनपीए) बंदरातून देशात बेकायदेशीर पद्धतीने आणल्या जाणाऱ्या परदेशी सिगारेटच्या साठ्यावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई युनिटने मोठी कारवाई करत १३.१८ कोटी रुपयांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कस्टम ड्युटी टाळण्यासाठी खोटी घोषणा

खास माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी जेएनपीए बंदरात आलेल्या एका कंटेनरची तपासणी केली. कंटेनरमध्ये ‘कोटेड कॅल्शियम कार्बोनेट’ असल्याची बनावट घोषणा करून १०१४ कार्टून विदेशी सिगारेट देशात घुसवण्याचा डाव होता. अधिकाऱ्यांनी कार्टून तपासल्यानंतर १ कोटी १ लाख ४० हजार बेकायदेशीर सिगारेट जप्त करण्यात आल्या.

भारतामध्ये विक्रीस बंदी असलेले प्रकार

जप्त केलेल्या सिगारेटवर कोणताही वैधानिक इशारा किंवा आरोग्यविषयक चेतावणी नसल्याने त्या पूर्णतः बेकायदेशीर ठरतात. भारतात अशा सिगारेटच्या विक्रीस आणि प्रसारास बंदी आहे, कारण या उत्पादनांचा तरुण पिढीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

अटक केलेल्या व्यक्तीविरुद्ध कस्टम कायदा, १९६२ आणि सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम, २००८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सिगारेट सिंडिकेटमागे कोणते नेटवर्क कार्यरत आहे? आणखी किती व्यक्ती या व्यवहारात सहभागी आहेत? हे उघडकीस आणण्यासाठी तपास यंत्रणांची कसोटी सुरू झाली आहे.

आरोग्यावर गंभीर घात करणाऱ्या तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केल्यामुळे सार्वजनिक आरोग्य व करप्रणालीच्या सुरक्षेला हातभार लागला आहे. डीआरआयची ही कारवाई देशांतर्गत बेकायदेशीर तंबाखू सिंडिकेटविरोधातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!