विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर परिसरातील नाल्यांमधून आलेल्या पाण्याचा जोर एवढा होता की देवकान्हे-धानकान्हे हद्दीतील कालव्यावरील नवा साकव पूर्णतः वाहून गेला. या साकवाचा उपयोग आदिवासी वस्तीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गासाठी होतो. साकव कोसळल्यामुळे येथील रहदारी ठप्प झाली असून ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

पहिल्याच पावसात पुलाचे निकृष्ट बांधकाम उघड
कोलाड पाटबंधारे विभागाचा उजव्या तीरावर असलेल्या कालव्याची दुरुस्ती गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. कालव्यावरील जीर्ण साकव काढून त्याऐवजी नवीन साकव बांधण्यात आले होते. मात्र, तीन चार दिवसापूर्वी कोसळलेल्या पावसामुळे हा साकव वाहून गेल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामस्थांच्या मते, हे निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदारांकडून करण्यात आले असून याची चौकशी होणे गरजेचे आहे.
मोलमजुरी करणाऱ्या आदिवासींवर उपासमारीची वेळ
सध्या पावसाळा सुरू असून भात पिकांची लागवड तेजीत आहे. अनेक आदिवासी नागरिक मोलमजुरीसाठी प्रवास करतात. परंतु रहदारीचा मार्ग कोसळल्याने त्यांना कामावर जाणे शक्य न झाल्याने उपासमारीची परिस्थिती ओढवली आहे. शिवाय, कालव्यात चिखल आणि वाहून आलेली माती भरल्याने प्रवास धोकादायक बनला आहे.
ग्रामस्थांची प्रशासनाला तातडीने उपाययोजनेची मागणी
ग्रामस्थांनी पाटबंधारे खात्याकडे तातडीने नवा साकव बांधण्याची आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली आहे. पावसाळ्यातील ही संकटमय अवस्था लक्षात घेऊन संबंधित विभागाने त्वरेने कार्यवाही करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
