मुंबई : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर चालणाऱ्या ‘सावली बार’वर मुंबई पोलिसांनी कारवाई करत अश्लील नृत्य सुरु असल्याच्या आरोपावरून धाड टाकली. या कारवाईत २२ बारबाला आणि २५ ग्राहक ताब्यात घेण्यात आले. बारचा परवाना ज्योती रामदास कदम यांच्या नावावर असल्याचे उघड झाले असून यामुळे योगेश कदम यांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
कारवाईचे तपशील
३० मे रोजी रात्री कांदिवली पश्चिमेतील ‘सावली बार’वर समता नगर पोलिसांनी छापा टाकला. रात्री १०:४५ ते पहाटे ४ पर्यंत ही कारवाई सुरू होती. बारमध्ये सुरू असलेल्या अश्लील नृत्यामुळे पोलिसांनी २२ बारबाला, २५ ग्राहक तसेच व्यवस्थापक, वेटर, कॅशियर यांना ताब्यात घेतले.
FIR मधील खुलासे
बारच्या मॅनेजरने चौकशीदरम्यान परवाना ज्योती कदम यांच्या नावावर असल्याची माहिती दिली. ज्योती कदम या योगेश कदम यांच्या मातोश्री व माजी मंत्री रामदास कदम यांची पत्नी आहेत. या खुलाशामुळे गृहराज्यमंत्री यांच्या हितसंबंधांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिस कारवाईनंतर बार बंद
छाप्यानंतर ‘सावली बार’ ३१ मेपासून बंद असून नामफलक झाकण्यात आला आहे. यामुळे मंत्री योगेश कदम अडचणीत आले असून, विधानपरिषदेतील उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांनी यावर थेट टीका करत बारचा संबंध गृहमंत्र्यांच्या खात्याशी असल्याचा दावा केला.
रामदास कदम यांचा बचाव
रामदास कदम यांनी बारच्या परवान्याचा मालकी हक्क मान्य केला, पण त्यांनी स्पष्ट केलं की बार गेल्या ३० वर्षांपासून शेट्टी नावाचा इसम चालवत असून अश्लील नृत्याचा संबंध त्यांच्या कुटुंबाशी नाही. एका घटनेनंतर त्यांनी स्वतःहून परवाना जमा केला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
कदम कुटुंबाने आमदार परब यांच्या आरोपांना बेछूट म्हणत त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, सेनेतील इतर मंत्री संजय शिरसाट आणि संदिपान भुमरे यांच्यानंतर कदम यांच्यावर आरोप झाल्याने शिंदेसेनेसमोरील राजकीय संकट अधिक गडद झाले आहे.