• Sun. Jul 20th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

स्व. नथुरामभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त पोयनाड येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला उत्साही शुभारंभ

ByEditor

Jul 20, 2025

क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग :
स्व. नथुरामभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त ‘कॅरम दिन’ म्हणून आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला पोयनाड येथील जय मंगल हॉलमध्ये उत्साही शुभारंभ झाला. रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन आणि झुंझार युवक मंडळ पोयनाड यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

उद्घाटन कार्यक्रमात रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजप नेते ॲड. आस्वाद पाटील यांच्या शुभहस्ते आणि कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष तुळपुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात झाली.

रायगड जिल्ह्याच्या विविध विभागांतील तब्बल १६८ कॅरम खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला असून विशेषतः पुरुष एकेरी स्पर्धेस भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. स्पर्धेला रंगत येत असून स्थानिक कॅरम प्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.

विजयी आणि उपविजयी खेळाडूंना झुंझार युवक मंडळाचे माजी अध्यक्ष पै. अन्वर बुराण यांच्या स्मरणार्थ अनुक्रमे ₹७००० आणि ₹५००० रोख बक्षीसासह आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

उद्घाटन सोहळ्याला उपस्थित मान्यवरांमध्ये दिपक साळवी (सचिव), प्रदीप वाईंगडे (कार्याध्यक्ष), वैभव पेठे (खजिनदार), पांडुरंग पाटील (सदस्य) तसेच झुंझार युवक मंडळाचे किशोर तावडे (सचिव), नंदकिशोर चवरकर (क्रीडाप्रमुख), अजय टेमकर आणि ॲड. पंकज पंडित यांचा समावेश होता.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!