मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला नवा सूर मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे हे दोघेही एकाच वेळी मुंबईतील सॉफिटेल पंचतारांकीत हॉटेलमध्ये उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. जरी दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये गेले असले, तरी त्यांच्या एकाच ठिकाणी उपस्थितीमुळे राजकीय अंदाज रंगू लागले आहेत.
टीव्ही ९ मराठीने भाजपच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेते आज संध्याकाळी सॉफिटेल हॉटेलमध्ये गेले होते. मात्र त्यांच्या भेटीबाबत कोणताही अधिकृत दावा करण्यात आलेला नाही.
गेल्या काही आठवड्यांत महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना खुलेआम सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्याचप्रमाणे फडणवीस यांनीही सभागृहात “2029 पर्यंत विरोधी पक्षात जाण्याची शक्यता नाही, पण तुम्हाला यायचं असेल तर स्कोप आहे,” असं विधान करून राजकीय चर्चांना गती दिली होती.
फडणवीस यांच्या ऑफरनंतर उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात जाऊन त्यांना हिंदी सक्तीविरोधातील एक पुस्तक भेट दिलं. फडणवीस यांनीही सभागृहात त्या भेटीचा उल्लेख करत युतीच्या चर्चेचा काही भाग असल्याचं स्पष्ट केलं.
या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी “तुम्ही ऑफर दिली म्हणून मी स्वागतासाठी आलो आहे,” अशा शब्दांत फडणवीसांना उद्देशून वक्तव्य केले होते. त्या भेटीचा व्हिडिओही सार्वजनिक झाला होता.
सॉफिटेल हॉटेलमधील उपस्थितीमुळे राजकीय विश्लेषकांच्या चर्चेला नवा आयाम मिळाला आहे. दोघेही एकाच स्थळी असले तरी भेट झाली नसल्याचे वृत्त समोर येत आहे.