अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यातील फुंडे डोंगरी व पाणजे गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे या खड्ड्यांत पाणी साचून अपघातांचे प्रमाण अधिक वाढले आहे. या पार्श्वभूमीवर अखिल आगरी समाज परिषदेच्या अध्यक्षा सीमाताई घरत यांनी संबंधित प्रशासनाकडे रस्त्याच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.
उरण तालुका हा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होत असला, तरी पायाभूत सुविधांच्या बाबतीत अनेक ठिकाणी अजूनही कमतरता जाणवते. सिडको, जेएनपीटी, नॅशनल हायवे अथॉरिटी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्यांची कामे केली जात असली, तरी गुणवत्ता आणि देखभाल याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अल्पावधीतच रस्त्यांची दुरवस्था होते.
सध्याच्या पावसाळ्यात खड्ड्यांनी रस्त्यांचे अक्षरशः जाळे तयार झाले असून, यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. या रस्त्यांवर याआधीही अपघात झाले असून, काही ठिकाणी नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत.
या पार्श्वभूमीवर सीमाताई घरत म्हणाल्या, “फुंडे डोंगरी व पाणजे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था गंभीर आहे. संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने खड्डे बुजवावेत आणि रस्त्याचे नूतनीकरण करावे.”
सध्या रस्त्यांची अवस्था पाहता, केवळ मागणी करून चालणार नाही, तर स्थानिक प्रशासनाने तातडीने हालचाल करणे आवश्यक आहे. अन्यथा रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.