अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. अटल सेतूला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याविरोधात माजी सरपंच अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी २५ जुलै रोजी खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दिघोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच किर्ती निधी ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी निवेदन सादर केले होते. मात्र, वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर संतप्त नागरिकांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागत आहे.

दिघोडे फाटा हा मुंबई, कोकण, गोवा या प्रमुख शहरांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. विशेषतः अटल सेतूशी जोडल्या गेल्याने या रस्त्यावर प्रवासी वाहतूक तसेच मालवाहतुकीच्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पावसाळ्यात रस्त्याची दुरवस्था अधिकच तीव्र झाली असून, प्रवासी, रुग्णवाहिका, विद्यार्थी व पर्यटक यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण करून कायमस्वरूपी समाधान द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार, शुक्रवारी (दि. २५ जुलै) दिघोडे फाटा येथे नागरिक रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन छेडणार आहेत. या आंदोलनाची सर्व जबाबदारी ही संबंधित प्रशासनाची राहील, असा इशारा सरपंच किर्ती निधी ठाकूर यांनी दिला आहे.