विठ्ठल ममताबादे
उरण, दि. २३ : खोपटे येथील पिकत्या जमिनी ऑल कार्गो कंपनीने अल्प दराने संपादित करून घेतल्या असल्या, तरी या कंपनीत स्थानिक भूमिपुत्र बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी मिळत नसल्यामुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याविरोधात सोनखार बाधित प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना, खोपटेच्या वतीने २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कंपनीच्या मुख्य गेटसमोर “गेट बंद आंदोलन” छेडण्यात येणार आहे.
स्थानिक तरुणांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने भूमिपुत्रांच्या जमिनी घेतल्या असतानाही यार्ड सर्वेअर व हाऊसकिपींग (झाडू खाते) सारख्या विभागांमध्ये त्यांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत. तसेच, कंपनीतील अन्य नियुक्त्यांमध्येही बाहेरून आलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष जयराम ठाकूर, उपाध्यक्ष रुपेश ठाकूर, सचिव हरिचंद्र खारकर, खजिनदार गणेश ठाकूर तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी, सदस्य आणि स्थानिक बेरोजगार युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
ऑल कार्गो लॉजिस्टिक कंपनीमध्ये १४ प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात हे आंदोलन करण्यात येत असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार संघटनेकडून व्यक्त करण्यात आला आहे. आंदोलनाच्या काळात कायद्याचे उल्लंघन किंवा गोंधळ निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कंपनी प्रशासनाची असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या संदर्भात उरणचे तहसीलदार उद्धव कदम, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र मिसाळ आणि कंपनी प्रशासन यांच्याशी पत्रव्यवहार करून मागण्यांची माहिती देण्यात आली होती. मात्र, कंपनी प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर गेट बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अध्यक्ष जयराम ठाकूर यांनी दिली.
संपूर्ण खोपटे गावातील नागरिकांनी आंदोलनात उपस्थित राहून स्थानिक बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सोनखार बाधित प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना, खोपटे तर्फे करण्यात आले आहे.