सलीम शेख
माणगाव : “मी भारतीय जनता पक्षाशी पूर्णतः एकनिष्ठ असून यापुढेही भाजप नगरसेविका म्हणून कार्य करत राहणार आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन माणगाव नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ४ मधील नगरसेविका ममता थोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
अलीकडील काळात माणगाव शहरात मोठ्या राजकीय हालचाली घडत असून एका प्रमुख नेत्याच्या पक्षांतराची जोरदार चर्चा आहे. येत्या २ ऑगस्ट रोजी माणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती असून या सोहळ्यात नगराध्यक्षांसह काही नगरसेवक व नगरसेविका सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर ममता थोरे यांच्याबाबतही चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. आम्ही पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीत होतो आणि गेल्या अडीच वर्षांत सत्तेत नसतानाही युती धर्म प्रामाणिकपणे पाळला आहे. मात्र, माझी निष्ठा भाजपशीच आहे.”
पुढे बोलताना ममता थोरे म्हणाल्या, “भाजपचे राज्य व केंद्रातील नेतृत्व, तसेच माझे बंधू निलेश थोरे, दक्षिण रायगड भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आली आहे. माझ्या वॉर्डात विविध सामाजिक उपक्रम, विकासकामे आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवला आहे.”
“भाजपची विचारधारा ही तळागाळातील जनतेशी जोडलेली असून, या विचारसरणीला अनुसरून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. विशेषतः महिलांना सक्षम करण्यावर माझा भर राहणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“युती धर्म पाळताना मित्र पक्षाच्या काही कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्यामुळे कुणी गैरसमज करून घेऊ नये. मी कोणतेही पक्षांतर करणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला.
