दिवेआगरला दोन प्रकल्प अद्याप सुरू होण्याच्या प्रतीक्षेत!
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या दिवेआगर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी झाली. मात्र, उद्घाटन झाल्यापासून दोन वर्ष उलटूनही प्रकल्प बंद स्थितीत आहे.
जिल्हा वार्षिक नियोजन मधून नागरी सुविधा अंतर्गत दिवेआगर येथे कचरा विघटन प्रकल्प उभारण्यात आला. यासाठी पन्नास लाख एवढी अंदाजपत्रक रक्कम होती. तर त्यापैकी बारा टक्के ही ग्रामपंचायत ने द्यायची होती. दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे व आमदार आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर एकही दिवशी या ठिकाणी कचऱ्याचे विघटन झाले नाही. कचऱ्याचे विलगिकरन करून गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावावी हा त्यामागचा उद्देश मात्र, उपयोगशून्य ठरलेल्या या प्रकल्पामुळे त्यावर खर्च झालेली सर्व रक्कम वाया गेल्यासारखे आहेत.
दिवेआगर पर्यटन ठिकाणी कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. त्या अंतर्गत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. सध्या त्या ठिकाणी आता भग्नावस्थेतील शेडला झाडा झुडपांनी वेढले आहे. संरक्षण भिंतीचे कुंपणचे बारा वाजले आहेत. सर्व साहित्याला गंज लागला आहे. एकूणच हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची आणखी लाखो रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.
दोन प्रकल्प बंदच!
सोळा लाखांचा प्लास्टिक विघटन प्रकल्प आणि दिवेआगर गावातील इतर कचरा विघटन प्रकल्प हा 37 लाखांचा आहे. या दोन्ही प्रकल्पाचे काम त्याच वेळी पूर्ण झाले. तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून दिवेआगर येथे हे प्रकल्प उभारण्यात आले. मात्र ते अद्याप बंद आहेत.
दिवेआगर येथे उभारण्यात आलेले प्रकल्प अद्याप का बंद आहे याची माहिती घेऊन लवकरच सुरु करण्यात येईल.
-नेहा भोसले,
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी.
मागील दिवसात प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र, योग्य प्रतिसाद मिळाला नाही. कचरा विघटन प्रकल्प हा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी बचत गट किंवा संस्था यांना निविदा प्रक्रिया काढण्यात येतील.
-सिद्धेश कोसबे,
सरपंच
