• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण : नवघर जिल्हा परिषद प्रभागाच्या रचनेवर हरकत; शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अतुल भगत यांची तहसीलदारांकडे मागणी

ByEditor

Jul 24, 2025

विठ्ठल ममताबादे
उरण :
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र असाधारण भाग एक अ – कोकण विभागीय पुरवणी क्रमांक RNI No. MAHBIL/2009/35574 दिनांक १४ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशानुसार उरण पंचायत समितीच्या बैठकीत नवघर जिल्हा परिषद प्रभागाची नवी रचना करण्यात आली आहे. मात्र या नव्या रचनेवर आता स्थानिक पातळीवर तीव्र हरकत नोंदवली जात आहे.

२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी नवघर प्रभागामध्ये समाविष्ट असलेली सोनारी, करळ आणि सावरखार ही गावे नव्या रचनेत वगळण्यात आली आहेत, ही बाब स्थानिक जनतेत नाराजीचा विषय ठरत आहे. त्यामुळे ही गावे पुन्हा नवघर जिल्हा परिषद प्रभागामध्ये समाविष्ट करण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी केली आहे.

याशिवाय, काळा धोंडा हा भाग सध्या चाणजे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत असल्यामुळे, तो चाणजे जिल्हा परिषद प्रभागात समाविष्ट करण्यात यावा, अशीही मागणी श्री. भगत यांनी केली आहे. त्यांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे लिहित पत्राद्वारे तसेच हरकत अर्जाच्या माध्यमातून ही भूमिका मांडली आहे.

भारतीय लोकसंख्येची जनगणना मागील १२ वर्षांपासून झालेली नसल्यामुळे, जिल्हा परिषद प्रभाग रचनेत लोकसंख्येचे अद्ययावत चित्र उपलब्ध नाही. परिणामी, नव्या रचनेत अनेक पारंपरिक प्रभाग विस्कळीत झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर, २०१७ पूर्वीप्रमाणे पारंपरिक गावे व प्रभाग संरचना कायम ठेवावी, अशी ठाम भूमिका अतुल भगत यांनी घेतली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांकडून या मागणीला समर्थन मिळू लागले असून, आगामी काळात यावर राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!