इंदापूर–वाढवण रस्त्याची दयनीय अवस्था; माजी सरपंच विलास शिंदे यांची शासनाकडे तातडीने डांबरीकरणाची मागणी
सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील इंदापूर ते वाढवण दरम्यानचा सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता अक्षरशः चाळण झाल्यासारखा झाला आहे. ठिकठिकाणी खोल खड्डे, त्यात साचलेले पावसाचे पाणी आणि हरवलेला रस्त्याचा मूळ चेहरा – यामुळे प्रवाशांना तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागत आहे.
हा रस्ता एक बाजूला मुंबई-गोवा महामार्गाला, तर दुसऱ्या बाजूला माणगाव-पुणे मार्गाला जोडतो, त्यामुळे यावरून दररोज शेकडो वाहने आणि नागरिक प्रवास करतात. स्थानिक विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा यांना या रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या समस्येकडे लक्ष वेधत पाणसई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलास शिंदे यांनी संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींना पत्रव्यवहाराद्वारे मागणी केली आहे की, या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे.
त्यांनी आरोप केला की, काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे स्थानिक नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अपघातांची शक्यता वाढली असून रस्त्यावरील प्रवास धोकादायक बनला आहे.
इंदापूर हे परिसरातील मुख्य बाजारपेठ आहे, जिथे शेतकरी, दुकानदार, विद्यार्थी, महिला यांचा मोठा वावर असतो. येथे शाळा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने सतत वर्दळ असते. पण खराब रस्त्यामुळे हा सगळा व्यवहार अडखळत चालला आहे.
शिंदे यांनी सांगितले की, रस्ता नसेल तर शिक्षण, आरोग्य, व्यवसाय आणि रोजगार अशा सगळ्या बाबी अडथळ्यांत येतात. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण करणे ही काळाची गरज आहे.
स्थानिक नागरिकांनीही सोशल मिडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून या समस्येला वाचा फोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
