अमुलकुमार जैन
अलिबाग : अलिबाग शहरालगत ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांवर बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या भाजी विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी अलिबाग येथील गणेश भाजी विक्रेते सामाजिक विकास मंडळ यांनी केली आहे. या मागणीसाठी मंडळाने अलिबाग पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
मंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गणेश भाजी विक्रेते मंडळ हे अधिकृतपणे नोंदणीकृत असून, त्यातील सर्व सदस्य अलिबाग शहर व तालुक्यातील स्थानिक भाजी विक्रेते आहेत. हे विक्रेते नगरपरिषद व बाजार समितीकडून ठराविक दराने शुल्क भरून अधिकृतपणे भाजी विक्री करत असून, त्यांच्या व्यवसायावर पोटापाण्याचा आधार आहे.

मात्र अलीकडच्या काही महिन्यांपासून अलिबाग शहरालगतच्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांवर अनधिकृतरित्या भाजीचे ढिग लावून घाऊक विक्री सुरू आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा, नियमित भाजी विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः स्नेहल लॉज परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत विक्री सुरू असल्याचे मंडळाने निदर्शनास आणून दिले आहे.
मंडळाचे म्हणणे आहे की, या बेकायदेशीर विक्रेत्यांकडून भाजी घाऊक प्रमाणात विकत घेऊन किरकोळ विक्री केली जात आहे. यामुळे नियमबद्ध विक्रेत्यांना स्पर्धेत टिकणे अशक्य होत असून, अनेकांना उपासमारीची वेळ येत आहे. त्यांचे गुंतवलेले भांडवल सुद्धा वसूल होत नाहीये.
२२ जुलै २०२५ रोजी गणेश भाजी विक्रेते मंडळाने ग्रामपंचायत चेंढरे, कुरूळ व वेश्वी यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला होता. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. चेंढरे ग्रामपंचायतीने स्नेहल लॉज परिसरातील अनधिकृत विक्रीकडेही दुर्लक्ष केल्याची तक्रार निवेदनात नमूद आहे.
गणेश भाजी विक्रेते सामाजिक विकास मंडळाने अलिबाग पंचायत समितीकडे मागणी केली आहे की, तत्काळ चेंढरे, कुरूळ व वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी आणि अधिकृत विक्रेत्यांच्या हक्काचे संरक्षण करावे.
या मागणीची गंभीर दखल घेत अलिबाग पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनीही या मुद्द्यावर सकारात्मक भूमिका दर्शवली असून, अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर लवकरच कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत.
