अमुलकुमार जैन
रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला पाच महिन्यांची गर्भवती केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर अलिबाग जिल्हा रुग्णालयात गर्भपाताची वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रकरणी वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलगी ही पेण तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका गावातील असून तिचे अलिबाग तालुक्यातील आत्याच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. पीडितीच्या वडिलांनी त्यांचा विवाह अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर करण्यास मान्यता दिली होती. मात्र, या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने तिला विवाहाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
पीडित मुलगी ही फक्त अल्पवयीनच नव्हे, तर वीस आठवड्यांची गर्भवती असल्याचे उशिरा लक्षात आल्यानंतर, दोघांनी एका मंदिरात हार घालून एकत्र राहण्यास सुरुवात केली. मात्र, काही दिवसांपूर्वी पीडितेला पोटदुखीची तक्रार झाल्याने तिला अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती तिचा गर्भपात झाल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांकडून तत्पर कारवाई
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनंतर वडखळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडित मुलीचा जबाब नोंदवला. त्यानंतर POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गंभीर प्रश्न आणि प्रशासनाची जबाबदारी
महत्वाचे म्हणजे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याच जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना वाढीस लागल्याची नोंद आहे. गेल्या काही आठवड्यांत २० पेक्षा अधिक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे महिला सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतो.