प्रतिनिधी
रायगड : राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, तलाठ्यांपासून ते उपजिल्हाधिकारीपातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांना आता दररोज कार्यालयात प्रत्यक्ष हजेरी लावून ‘फेस ॲप’द्वारे हजेरी नोंदवणे अनिवार्य करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भातील निर्णयाची माहिती दिली असून, लवकरच अधिकृत शासन निर्णय जारी होणार आहे.
हजेरी ‘फेस स्कॅन’वर; वेतन त्यावरच अवलंबून
ऑगस्ट महिन्याचे वेतन (जे सप्टेंबरमध्ये वितरित होते) फक्त ‘फेस ॲप’वर दररोज हजेरी नोंदवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे. जर कोणत्याही दिवशी कर्मचाऱ्याने उपस्थितीची नोंद केली नाही, तर तो दिवस गैरहजेरी मानला जाणार आहे.
जिओ-फेन्सिंग आणि मोबाईल अॅप आधारित प्रणाली
‘फेस ॲप’सोबतच जिओ-फेन्सिंग तंत्रज्ञान वापरून कर्मचाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील उपस्थिती निश्चित केली जाणार आहे. हे आदेश केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार राज्यात लागू करण्यात आले असून, सर्व महसूल कर्मचाऱ्यांना कार्यस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील आढावा बैठकीत निर्देश
महसूल मंत्री बावनकुळे यांनी नुकत्याच झालेल्या रायगड जिल्ह्यातील आढावा बैठकीत या नव्या प्रणालीबाबत सविस्तर चर्चा करत स्पष्ट निर्देश दिले. यापुढे पोस्टिंग असलेल्या गावातच उपस्थितीची नोंद व्हावी लागणार आहे, अन्यथा अनुपस्थिती मानली जाणार आहे.