अटल सेतूपासून दिघोडे फाट्यापर्यंतचा रस्ता खड्ड्यांनी भरलेला
अनंत नारंगीकर
उरण, दि. २५ : अटल सेतू ते दिघोडे फाटा या कोकणात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था आणि रस्त्यावरील मोठमोठे खड्डे यामुळे संतप्त झालेल्या दिघोडे गावातील नागरिकांनी आज चिखलात रुतलेल्या खड्ड्यांमध्ये बसून अनोखे आंदोलन छेडले.
या मार्गावरून दररोज शेकडो प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण व पर्यटक ये-जा करत असल्याने या खड्ड्यांचा त्रास सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. याविरोधात “खड्डे बुजवा व रस्ता रुंद करा-काँक्रीट करा” अशी मागणी करत शुक्रवारी (दि. २५) दिघोडे फाट्यावर नागरिकांनी थेट चिखलमय खड्ड्यात बसून आंदोलन केले.

या आंदोलनात ग्रामपंचायत सरपंच किर्तीनिधी ठाकूर, महिला, युवक व स्थानिक प्रवासी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जवळपास दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे मुंबई व कोकण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेश पवार आणि उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांना खड्डे बुजवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिले.
या लेखी हमीच्या आधारे तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले. सरपंच ठाकूर यांनी आंदोलनात सहभागी सर्व ग्रामस्थ, महिला व प्रवाशांचे आभार मानले. दरम्यान, संबंधित एमपीपी खारपाटील कंपनीने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.
या आंदोलनात दिघोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश पाटील, वर्षकेतू ठाकूर, सरपंच किर्तीनीधी ठाकूर, उपसरपंच संदेश पाटील, काँग्रेस पक्षाचे नेते रामनाथ पंडित, प्रेमनाथ म्हात्रे, माजी सरपंच संकीता जोशी, अॅड. निग्रेस पाटील, सुरेश पाटील, रमेश कोळी, अनंत नाखवा, मंदार पाटील, वरुण पाटील, अलंकार ठाकूर, गोकुळदास माळी, सामाजिक कार्यकर्ते परशुराम पाटील, रोहिदास ठाकूर, अनिल पाटील, शक्ती कोळी, नरहरी कोळी, श्रावण घरत, प्रल्हाद कासकर, दयानंद पाटील, नवनाथ ढवळे, संदिप जोशी, अलंकार पाटील, माजी उपसरपंच आरती कोळी, ग्रामपंचायत सदस्य अलंकार कोळी, रेखा कोळी, कैलास म्हात्रे, अभिजित पाटील, अपेक्षा पाटील, अपेक्षा कासकर, महेश म्हात्रे, सचिन कासकर, नरहरी कोळी, रुतुराज पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य, महिला प्रतिनिधी व मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.