• Sat. Jul 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पांडवांदेवी येथील सामूहिक विवाह सोहळ्यात गोंधळ; पती-पत्नीस मारहाण, आयोजकांविरोधात गुन्हा दाखल

ByEditor

Jul 25, 2025

अमुलकुमार जैन
अलिबाग :
तालुक्यातील पांडवांदेवी येथे आयोजित एका भव्य सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान मोठा गोंधळ उडाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन करत परवानगी न घेता आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमात एका पती-पत्नीस मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिनपरवानी विवाह सोहळा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलले

पांडवांदेवी येथील ‘हॉटेल पाटील ब्रदर्स’ या ठिकाणी एक हजार जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, जिल्हाधिकारी रायगड यांनी दिलेल्या जमावबंदीच्या आदेशाचा भंग करून कोणतीही शासकीय परवानगी न घेता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामुळे आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पती-पत्नीस मारहाण; आठ जणांविरोधात गुन्हा

विवाह सोहळ्यादरम्यान सचिन यशवंत लोभी व जिवीता सचिन लोभी (रा. वांघजई, ता. अलिबाग) यांना कार्यक्रमस्थळी दमदाटी, शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी ईश्वर नाईक, महादेव लेडी, अर्जुन गोपाल नाईक, सुनील अंकुश वाघे, सुमित राजेश नाईक, रोशन नरेश वाघे, कैलास चंद्रकांत नाईक व त्यांचा मामा (पूर्ण नाव उपलब्ध नाही, सर्व रा. करंजाडे, ता. पनवेल) यांच्याविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक कोंडी आणि पोलिसांची तत्परता

या भव्य सोहळ्याला जिल्हाभरातून सुमारे तीन ते चार हजार नागरिक उपस्थित होते. मात्र, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि अरुंद रस्त्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. रविवार असल्यामुळे अलिबाग व मुरुडकडे येणाऱ्या पर्यटकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.
पोलिस उपनिरीक्षक अंकुश सांगडे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी ए.एस.आय. पवार, ए.एस.आय. भगत व पो.ह. सतीश पाटील यांची नियुक्ती केली. आयोजकांकडे परवानगी नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी गुरनं. 65/2025 अन्वये मुंबई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1)(C), भारतीय दंड संहिता व भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलमे 69, 115(2), 189(2), 191(2), 190(2), 351(2), 352 तसेच POCSO अधिनियम 2012 चे कलम 4 आणि 6 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक मरस्कोले करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!