अमुलकुमार जैन
अलिबाग : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी महाड आणि पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. मात्र हा आदेश सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी सोशल मिडियावर प्रसिद्ध झाल्यामुळे अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले की, महाबळेश्वर, ताम्हीणी घाट, महाड व पोलादपूर परिसरात रात्रीपासून अतिमुसळधार पाऊस झाल्याने सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडल्याने महाड उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार ही तातडीची कारवाई करण्यात आली.
पावसामुळे समुद्रात भरती आणि पूरस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन सुट्टीचा निर्णय घेण्यात आला असला तरी, विद्यार्थ्यांना याची वेळेवर माहिती मिळाली नाही. अमित नाईक या विद्यार्थ्याने नाराजी व्यक्त करत सांगितले, “जर सुट्टी द्यायचीच होती तर ती एक दिवस आधीच घोषित करायला हवी होती. आम्ही ग्रामीण भागांतून येतो; एकट्या माझ्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्यांना हे झळ सोसावे लागले.”
विद्यार्थ्यांची ही प्रतिक्रिया प्रशासनासाठी एक महत्त्वाची शिकवण ठरू शकते — भविष्यात अशा परिस्थितींसाठी योग्य वेळी व अचूक माध्यमांतून सूचनांचा प्रसार होणे अत्यावश्यक आहे.