घन:श्याम कडू
उरण : गुगल मॅपवर दाखवलेला रस्ता नेमका कुठे संपतो, याची खात्री न करता भरधाव कार चालवणं एका महिलेच्या जीवावर बेतण्याची वेळ नवी मुंबईतील बेलापूर येथे आली होती. उलवेच्या दिशेने निघालेली कार बेलापूर खाडीपुलावर न जाता गुगल मॅपवर दाखवलेल्या सरळ मार्गानुसार थेट खाडी किनाऱ्यावर असलेल्या ध्रुवतारा जेट्टीवर पोहोचली आणि थेट खाडीत कोसळली.
ही घटना गुरुवारी मध्यरात्री म्हणजेच शुक्रवारी पहाटे १ वाजता घडली. सदर जेट्टीवर कोणताही सुरक्षा कठडा नसल्याने कार थेट पाण्यात गेली. मात्र सुदैवाने, सागरी सुरक्षा पोलिसांची चौकी अगदी जवळच असल्याने ही घटना तत्काळ त्यांच्या निदर्शनास आली.
पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत गस्ती व रेस्क्यू बोटीद्वारे कारमधील महिलेचा जीव वाचवला. त्यानंतर खाडीत अडकलेली कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. महिलेने पोलिसांना सांगितले की, ती गुगल मॅपवर रस्ता पाहत होती आणि पुलाऐवजी खालील रस्ता सरळ गेला असल्याने तोच योग्य समजून कार चालवली. मात्र त्या मार्गाच्या शेवटी जेट्टी असून, पुढे पाण्यात रस्ता संपतो याची कल्पना मॅपवरून झालीच नाही.
देशभरात गुगल मॅपवर अवलंबून राहिल्यामुळे अपघात वाढत आहेत. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा डिजिटल मार्गदर्शनावर संपूर्ण विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष परिस्थितीचा अंदाज घेणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित झाले आहे. दरम्यान, सागरी पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि प्रसंगावधानामुळे एक अनमोल जीव वाचला आहे, याबद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.