अमुलकुमार जैन
रायगड : उरण तालुक्यातील करंजा येथून मासेमारीसाठी निघालेली ‘तुळजाई’ ही बोट शनिवारी (दि. २६ जुलै) खांदेरी किल्ल्यानजीक समुद्रात लाटांच्या जोरदार प्रहारामुळे पलटी झाली होती. या दुर्घटनेत बोटीवरील आठ मच्छीमारांपैकी पाच जण सुटून किनाऱ्यावर पोहोचले होते. मात्र तिघे बेपत्ता झाले होते. अखेर तब्बल ५० तासांच्या शोधानंतर सोमवारी (दि. २८) सकाळी तिघांचे मृतदेह सापडले.

नरेश राम शेलार, धीरज कोळी (रा. कासवला पाडा, उरण) आणि मुकेश यशवंत पाटील (रा. करंजा, उरण) अशी मृत मच्छीमारांची नावे आहेत. तिघांचे मृतदेह अनुक्रमे सासवणे, दिघोडे व किहीम किनाऱ्याजवळ आढळले, अशी माहिती मांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.
मनोज गणपत कोळी यांच्या मालकीची ‘तुळजाई’ नावाची बोट (IND MH 7MM 1405) २६ जुलै रोजी सकाळी सातच्या सुमारास करंजा बंदरातून मासेमारीसाठी निघाली होती. खांदेरी किल्ल्यानजीक समुद्रात लाटांच्या जोरदार प्रहारामुळे बोट पलटी होऊन जलसमाधी मिळाली. बोटीवरील पाच मच्छीमार हेमंत गावंड (आवरे), संदीप कोळी व रोशन कोळी (करंजा), शंकर भोईर व कृष्णा भोईर (आपटा, पनवेल) हे पोहत किनाऱ्यावर आले होते.
प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह
वातावरण व समुद्र स्थिती खराब असल्याने प्रवासी वाहतूक व मासेमारीस बंदी असतानाही काही बोटी बिनधास्तपणे समुद्रात उतरत असल्याचे दिसून येत आहे. मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदर अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप होत आहे.
चार दिवसांत चार मृत्यू
गेल्या चार दिवसांत रायगड जिल्ह्यात मच्छीमारीदरम्यान घडलेल्या दोन अपघातांमध्ये चार मच्छीमारांचा मृत्यू झाला आहे. तिघांचा मृत्यू तुळजाई बोट दुर्घटनेत तर चौथ्याचा मृत्यू मोरा जेट्टीजवळ लहान बोट उलटून झालेल्या अपघातात झाला आहे.
कारवाईची मागणी
या दुर्घटनेप्रकरणी रायगड जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त संजय पाटील, उरण येथील परवाना अधिकारी आणि बोट मालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष वीरेश मोरखडकर यांनी केली आहे.
