क्रीडा प्रतिनिधी
रायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे (RDCA) अद्याप स्वतःचे मैदान नसल्यामुळे विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धा आणि सराव शिबिरांसाठी खासगी क्लब व कंपन्यांच्या मैदानांवर अवलंबून राहावे लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी असोसिएशनने आता स्वतःच्या हक्काच्या मैदानासाठी प्रयत्न सुरू केले असून, या प्रयत्नांना पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे.
RDCAचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन मैदानासाठी अधिकृत प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर ठाकूर यांनी तात्काळ सकारात्मक भूमिका घेत, रायगड जिल्ह्यात किंवा पनवेल तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दीर्घ मुदतीसाठी खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. येत्या आठवड्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला स्वतःचे मैदान उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील होतकरू क्रिकेटपटूंना दर्जेदार प्रशिक्षण व स्पर्धांचे व्यासपीठ मिळू शकेल, अशी अपेक्षा अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी व्यक्त केली आहे.
