शशिकांत मोरे
धाटाव, दि. २८ जुलै : रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा आणि पसरलेली दुर्गंधी नागरिक, पादचारी व कामगार वर्गाच्या आरोग्यासाठी गंभीर समस्या बनली आहे. रस्त्यालगत टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे या परिसराला अक्षरशः उकिरड्याचे स्वरूप आले असून, या भागातून जाणाऱ्या प्रत्येकाला नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
अनधिकृत टपऱ्यांतून होणारी कचऱ्याची सर्रास फेक
औद्योगिक वसाहतीमधील हॉटेल्स, कंपन्या आणि अनधिकृत टपऱ्यांतून मोठ्या प्रमाणावर कचरा सर्रासपणे रस्त्यावर टाकला जात आहे. पावसामुळे भिजलेला व कुजलेला हा कचरा दुर्गंधीचा मुख्य स्रोत ठरतो आहे. विशेषतः प्लास्टिकच्या पिशव्यांत भरलेला कचरा रस्त्यावर पसरल्यामुळे कुत्र्यांनी त्यात उचापती करत परिसर आणखी अस्वच्छ केला आहे.
नाल्यांची दुर्दशा – निचऱ्याला अडथळा
या औद्योगिक वसाहतीत असलेल्या रस्त्यालगतचे नाले माती, गवत, झुडपं व गाळाने पूर्णपणे भरले आहेत. परिणामी पाण्याचा निचरा होत नाही व त्यातून साचलेल्या पाण्याची दुर्गंधी आणखी वाढते आहे. ही स्थिती नागरिकांच्या आरोग्यावर आणि परिसराच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
वर्षानुवर्षे खर्च तरी परिणाम कुठे?
दरवर्षी नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीसाठी होणाऱ्या खर्चाचे नेमके काय होते, याबद्दल नागरिकांत संभ्रम आहे. अनेक समस्यांवर वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे आरोप होत आहेत.
या समस्यांचा पाढा रोहा इंडस्ट्रियल असोसिएशन आणि अलिबाग येथील संबंधित अधिकाऱ्यांकडे लवकरच सादर केला जाणार असल्याची माहिती स्थानिक नागरिक आणि कामगार प्रतिनिधींनी दिली. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
