भाविकांसाठी देवस्थानचा विशेष उपक्रम सुरू
गणेश प्रभाळे
दिघी : श्रावण महिन्याच्या प्रारंभीच श्री क्षेत्र हरिहरेश्वर देवस्थानने भाविकांसाठी खास उपक्रम सुरू केला असून, पहिल्या श्रावणी सोमवारपासून ‘गुळबुंदी लाडू’ या प्रसादाची विक्री थेट मंदिर परिसरातच करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ देवाच्या चरणी प्रसाद अर्पण करून करण्यात आला. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष वामन बोडस, विश्वस्त निनाद गुरव, सौ. दया भिडे, श्री जोशी, श्री करमरकर, गुरव पुजारी व सेवेकरी उपस्थित होते.

हरिहरेश्वर देवस्थानकडून यापूर्वीही मंदिरातील निर्माल्याचा पुनर्वापर करून अगरबत्ती, धूपवाती आणि सेंद्रिय खत निर्मिती यासारखे पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आले आहेत. या उपक्रमांना भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे.
या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर देवाचा प्रसादही संस्थेच्या वतीनेच तयार करून विक्रीस ठेवण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या देवस्थानच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील विविध मंदिरांमध्ये जाऊन तेथील प्रसाद विक्री व्यवस्थेचा अभ्यासही करण्यात आला.
या प्रक्रियेदरम्यान रत्नागिरीच्या प्रसिद्ध उद्योजिका सौ. दया आनंद भिडे यांनी श्री केदार बोडस यांच्याशी संपर्क साधून, देवस्थानचे सचिव सिद्धेश पोवार यांच्यासह संपूर्ण कल्पना सविस्तर मांडली. त्यानंतर हरिहरेश्वर येथे भेट देऊन प्रस्ताव लेखी स्वरूपात सादर करण्यात आला.
या उपक्रमामुळे भाविकांना मंदिर परिसरातच शुद्ध, सात्विक व पारंपरिक गुळबुंदी लाडू प्रसाद सहज उपलब्ध होणार आहे. देवस्थानचा हा उपक्रम भाविकांसाठी आनंददायक आणि श्रावणातील अध्यात्मिक अनुभव अधिक समृद्ध करणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
