घन:श्याम कडू
उरण : पावसाळी मासेमारी बंदी असतानाही करंजा येथून बेकायदेशीरपणे समुद्रात गेलेल्या बोटीच्या दुर्घटनेत चार खलाशांचा बळी गेल्याच्या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. ही केवळ अपघाती घटना नसून, मत्स्यविभागातील अधिकारी आणि मच्छीमार सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेली थेट हत्या आहे, असा गंभीर आरोप करत उरण तालुका मराठी पत्रकार संघाने दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे.
शनिवारी खांदेरी किल्ल्याजवळ मासेमारीसाठी गेलेली ‘तुळजाई’ नावाची बोट समुद्रात बुडाली. आठ खलाशांपैकी तीन जण बेपत्ता झाले होते. त्यांचे मृतदेह सोमवारी दिघोडे, सासवणे आणि किहीम किनाऱ्यावर सापडले. याच कालावधीत मोरा येथेही एक बोट बुडून आणखी एका खलाशाचा मृत्यू झाला. अवघ्या दोन दिवसांत चार जणांनी आपला जीव गमावला, मात्र मत्स्यविभाग आणि परवाना अधिकारी यावर अजूनही मौन बाळगत आहेत.
बंदी असूनही मासेमारीस परवानगी कशी?
पावसाळी मासेमारी बंदी दरम्यानही उरण परिसरातील काही ‘विशेष’ बोटी समुद्रात का आणि कशाच्या आधारे जातात, हा गंभीर प्रश्न आहे. यामागे मत्स्यविभागातील अधिकाऱ्यांचे आर्थिक साटेलोटे आणि मच्छीमार सोसायट्यांतील काही पदाधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप पत्रकार संघाने केला आहे.
गेल्यावर्षीही असाच एक खलाश समुद्रात बुडून गेला होता, पण त्याची कुठलीही चौकशी झाली नाही, ही बाब अधिक चिंताजनक आहे.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
ही संपूर्ण व्यवस्था ‘सांगता-संगती’ची असल्याचा आरोप करत, गरीब खलाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे हाच एकमेव उपाय आहे, असा ठाम इशारा पत्रकार संघाने दिला आहे. या दुर्घटनेतून बचावलेले खलाश सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, मात्र चार कुटुंबांनी आपले कर्ते गमावले आहेत. प्रशासन शांत आहे, दोषी मोकाट फिरत आहेत, आणि हातावर पोट असलेल्या खलाशांचे जीव धोक्यात टाकले जात आहेत.
“दरवर्षी अशीच जीवितहानी होणार का, की प्रशासनाला आता तरी जाग येणार?” हा सवाल थेट रायगड जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.
