अनंत नारंगीकर
उरण, ३१ जुलै : उरणमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील कोप्रोली रस्त्यावर अतिक्रमणाचा मोठा विळखा पडत चालला आहे. व्यवसायिकांकडून रस्त्यावर मोठाले दगड तसेच ज्वलनशील गॅस सिलिंडर ठेवल्याने अपघाताची शक्यता वाढली असून, दररोज वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

जेएनपीटी बंदराच्या विकासामुळे उरण परिसरात गोदामांची संख्या झपाट्याने वाढली असून, नागरीकरणासही वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर कोप्रोली रस्त्यावरील वाहतूक भार प्रचंड वाढला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने कोप्रोली रस्त्याचे रुंदीकरण करून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असला, तरी अतिक्रमणमुळे त्याचा उपयोग पूर्णत्वास जात नाही.

रोजची वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका
अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावरच आपले साहित्य ठेवण्यास सुरुवात केली असून, ज्वलनशील गॅस सिलिंडर आणि मोठ्या दगडांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असून, लवकरच उपाययोजना न झाल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिक, प्रवासी आणि स्थानिकांनी केली आहे.
“कोप्रोली रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असून, या अडथळ्यांमुळे नागरिकांचे जिवाशी खेळ होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पावले उचलून रस्त्यावरचे अतिक्रमण हटवावे.
-दिपक पाटील (पिरकोण)
माजी उपसरपंच
