विश्वास निकम
कोलाड : मंगळवार, दिनांक २९ जुलै २०२५ रोजी नागपंचमीच्या औचित्याने सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था (SVRSS) आणि महसूल विभाग, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने गोवे गावामध्ये ‘आपत्ती व्यवस्थापन आणि सर्प विज्ञान’ या विषयावर प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये गावातील नागरिक, महिला, तरुण आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना SVRSS चे अध्यक्ष सागर दहिंबेकर यांनी सांगितले की, साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून तो शेतीसाठी उपयुक्त असतो. साप मारण्याऐवजी त्याला जीवनदान द्यावे, ही भावना समाजात रुजणे गरजेचे आहे. सापांमध्ये मण्यार, नाग, घोणस हे विषारी साप तर अजगर, धामण, कुकरी, कवड्या, दिवड हे बिनविषारी साप आहेत. पावसाळ्यात साप उष्णतेच्या शोधात किंवा अन्नासाठी मानवी वस्तीत येतात. भात शेतीत किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ती किड साप खातो आणि त्यामुळे शेतीचे संरक्षण होते. यामुळेच साप शेतकऱ्यांसाठी हितकारक ठरतात.

सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता शांत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशावेळी जखम झालेल्या जागेवर स्वच्छ पाण्याने धुवा आणि कापडाच्या पट्टीने हलक्याने बांधा. मात्र खूप घट्ट बांधल्यास रक्तप्रवाह अडथळीत होऊन त्या अवयवावर परिणाम होऊ शकतो. दर दहा मिनिटांनी एक मिनिटासाठी पट्टी काढून पुन्हा बांधावी. लिंबाचा पाला किंवा मिरची खाऊन साप विषारी आहे का हे ओळखण्याचा पारंपरिक मार्ग चुकीचा असून शक्य तितक्या लवकर रुग्णालयात जाणे हाच योग्य उपाय आहे.
कार्यक्रमात हृदयविकाराचा झटका ओळखण्याची प्राथमिक लक्षणे आणि उपाय याबाबतही माहिती देण्यात आली. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी व्यक्तीला घाम येणे, छातीत दुखणे आणि मानसिक तणाव जाणवतो. अशावेळी त्या व्यक्तीला शांत बसवून थंड पाण्याच्या पट्ट्यांनी पुसावे. कोणी रस्त्यात कोसळल्यास त्याला सावलीत नेऊन छाती दाबावी. तसेच पुराच्या काळात काय खबरदारी घ्यावी, याचेही मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात SVRSS टीमचे सागर दहिंबेकर, प्रयाग बामुगडे, विशाल जाधव, श्वेता विश्वकर्मा, शशांक दोडामणी, अजय भोकटे, विक्रांत कोंगले, भरत मालुसरे, यश वारकर, सोहम जवके, प्रणय शिंदे आणि देवेन रटाटे यांनी सहभाग घेतला. गोवे ग्रामस्थ, महिलावर्ग, युवक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या समारोपाला गोवे ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, सामाजिक कार्यकर्ते विजय पवार आणि पांडुरंग जाधव यांच्या हस्ते SVRSS टीमचा सत्कार करण्यात आला.
