विनायक पाटील
पेण : महापारेषण विभागात अनेक कंत्राटी कामगार गेल्या ५ ते १० वर्षांपासून विविध उपकेंद्रांमध्ये प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. मात्र आता नवीन विद्युत सहाय्यक पदांसाठी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेमुळे विद्यमान कंत्राटी कामगारांवर कामावरून कमी होण्याची वेळ येत असून, संपूर्ण राज्यातून जवळपास २६०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत महापारेषण प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सदर कामगारांनी भोईर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. यावर त्वरित कृती करत प्रसाद भोईर यांनी महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत स्पष्ट केलं की, “शिवसेना हा अन्याय कदापि सहन करणार नाही. जर कंत्राटी कामगारांना सेवेतून कमी करण्याचा प्रयत्न झाला, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

या मुद्द्यावर शिवसेना नेते व विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील पुढाकार घेत ऊर्जा विभागाच्या सचिवांशी थेट फोनवर चर्चा केली. सचिवांनी यासंदर्भात सकारात्मक पवित्रा घेत कंत्राटी कामगारांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली.
यानंतर प्रसाद भोईर यांनी महापारेषणचे मुख्य महाव्यवस्थापक एस. एस. गमरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. गमरे यांनीही आश्वस्त करत सांगितले की, “कंत्राटी कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ दिली जाणार नाही. शासन सहानुभूतीपूर्वक भूमिका घेईल.”
प्रसाद भोईर यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे आणि सजग प्रयत्नांमुळे राज्यातील हजारो महापारेषण कंत्राटी कामगारांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या या भूमिकेबद्दल राज्यभरातील महापारेषण कंत्राटी कामगारांनी प्रसाद भोईर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.