अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यातील करंजा बंदर परिसरात शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) सकाळी ‘बोट हायजॅक’ झाल्याची खबर पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली. दोन बंदूकधारी दहशतवाद्यांनी प्रवासी बोट ‘हायजॅक’ केली असून प्रवाशांना ओलीस धरल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस व अॅन्टी टेररिझम स्क्वॉड (ATS) घटनास्थळी दाखल झाली. काही वेळ वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले होते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, थरारपूर्ण कारवाईनंतर हे संपूर्ण प्रकरण ‘मॉक ड्रिल’ असल्याचे स्पष्ट झाले आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

घटनाक्रमानुसार, शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता उरण पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे माहिती मिळाली की, अलिबागहून आलेल्या एका प्रवासी बोटीत दोन दहशतवाद्यांनी प्रवाशांना ओलीस धरले असून बोट करंजा बंदरात दाखल झाली आहे. माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. तातडीने करंजा रेवस जलसेवा बोटीला घेराव घालण्यात आला. बोटीवर चकमक होऊन एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले तर दुसऱ्याला जिवंत पकडण्यात आल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. या वेळी संशयितांकडून आरडीएक्ससारखा स्फोटक पदार्थ सापडल्याचेही दाखवण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, क्यूआरटी (QRT), ATS, सागरी सुरक्षा बल, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, तसेच नवी मुंबई व उरण पोलीस ठाण्यांतील शंभरहून अधिक पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वातावरणात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मात्र, काही वेळानंतर तपासणीत हे संपूर्ण प्रकरण मॉक ड्रिल (तयारी चाचणी) असल्याचे निष्पन्न झाले.
या मॉक ड्रिलमध्ये करंजा, उरण, मोरा सागरी पोलीस स्टेशन तसेच न्हावा शेवा येथील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. सुमारे दोन तास चाललेल्या या सराव मोहिमेचा उद्देश सागरी दहशतवादाचा संभाव्य धोका ओळखणे आणि यंत्रणांची प्रतिक्रिया तपासणे हा होता, अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली.
तरीसुद्धा, घटनेच्या सुरुवातीला नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. भविष्यात अशा मॉक ड्रिलची पूर्वसूचना दिली जावी, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.