विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील कोलाड परिसरातील कुंडलिका नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले असून, पावसामुळे या भागात वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करणारे विद्यार्थी, वाहनचालक आणि सामान्य प्रवासी यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शिवाय, पादचारी पुलही धोकादायक स्थितीत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पुलाचे बांधकाम चार-पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाले असले तरी डांबरीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पावसाळ्यात पुलावर पाणी साचून तलावासारखे स्वरूप निर्माण होते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य निचरा व्यवस्था नसल्याने हे पाणी रस्त्यावरच साचते. विशेष म्हणजे, रस्त्याखाली पाण्याचा निचरा करणारे पाइप्स उंच लावल्यामुळे पाणी बाहेर निघत नाही आणि परिणामी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
या मार्गावरून गिता द. तटकरे पॉलिटेक्निकल कॉलेज मधील विद्यार्थी, धाटाव एमआयडीसीतील कामगार, कोलाड बाजारपेठ व हायस्कूलकडे जाणारे नागरिक रोजच्या रोज प्रवास करतात. मात्र, पुलावर साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या वाहनांमधून पाणी उडून विद्यार्थ्यांच्या अंगावर पडते, त्यामुळे त्यांना शाळेत न जाता परत घरी जावे लागते. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या मार्गाचे काम अठरा वर्षांपासून सुरू असूनही अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक ठेकेदार बदलले, काही ठिकाणी काम पूर्ण झाले असले तरी त्याची गुणवत्ता अत्यंत कमी दर्जाची आहे. शासनाकडून ठेकेदारांवर योग्य नियंत्रण नसल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
प्रवाश्यांच्या मते, कुंडलिका पुलावर पाणी साचण्याची समस्या सोडवण्यासाठी निचऱ्याचे पाइप योग्य उंचीवर बसवणे, तसेच सध्याचे पाइप नियमित स्वच्छ करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.