घन: श्याम कडू
उरण : “युवासेना म्हणजे शिवसेनेचा अंगार, आणि जो अंगार मावळतो, त्याला फडताळात ठेवण्याची परंपरा आम्ही पाळतो!” — अशा स्पष्ट शब्दांत युवासेनेने पक्षशिस्त भंग करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर थेट कारवाई करत कोकणात खळबळ माजवली आहे.
युवासेनेच्या ठाणे येथील महत्त्वपूर्ण बैठकीत पनवेल आणि उरण विधानसभा क्षेत्रातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या धोरणाविरुद्ध हालचाली केल्या. त्यांच्या वर्तनामुळे संघटनेची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याची गंभीर दखल घेत युवासेनेचे विभागीय सचिव (कोकण विभाग) रूपेश पाटील, तसेच पनवेल व उरण विधानसभा क्षेत्रांतील सर्व युवासेना पदाधिकारी यांना तात्काळ पदावरून हटवण्यात आले, अशी अधिकृत घोषणा युवासेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी केली.

युवासेनेत शिस्त हीच ओळख मानली जाते आणि ती मोडणाऱ्यांना कोणतीही गय न करता बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो, हे पुन्हा एकदा या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे कोकणातील युवासेना गोटात खळबळ उडाली असून, संघटनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.
या कारवाईमुळे शिस्तीला प्राधान्य, नेतृत्वाला न जुमानणाऱ्यांवर कठोर भूमिका आणि शिवसेनेचा आत्मा म्हणून ‘आदेश’ या मूल्याची पुनःप्रस्थापना करण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.
याविषयी प्रतिक्रिया विचारल्यावर युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेस सरनाईक यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, पक्षशिस्तीला बाधा आणणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला राजकीय वरदहस्त दिला जाणार नसल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.