तीन तास बोट सेवा ठप्प; प्रवाशी संतप्त
प्रतिनिधी
उरण : करंजा प्रवासी जेट्टीवर शुक्रवारी (ता. १) सकाळी अचानक ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आल्यानं प्रवाशांचे तीन तास अक्षरशः हाल झाले. सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत एकाही बोटीला जेट्टीवरून सोडण्यात आलं नाही, परिणामी कामावर, शासकीय कामकाजावर, न्यायालयात किंवा घरी परतणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि संताप निर्माण झाला.

सकाळी ९ वाजता “दोन संशयित प्रवासी रेवसहून बोटीतून करंजाकडे निघाले आहेत” असा फोन आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई हाती घेतली. हवालदार सचिन पाटील यांनी माहिती मिळताच उरण पोलीस ठाण्याला कळवले. क्षणार्धात उरण, मोरा, नवी मुंबई पोलीस, अग्निशमन दल, अॅम्ब्युलन्स, फॉरेन्सिक पथक, श्वान पथक, आणि बोटीद्वारे आणखी फोर्स घटनास्थळी दाखल झाले.

‘संशयित’ बोटीत लपल्याचा अंदाज घेऊन जेट्टीवर ताबा घेतला गेला. प्रवाशांना थांबवून ठेवण्यात आलं आणि काही वेळाने “हा मॉक ड्रिल होता!” असं जाहीर करण्यात आलं.
“हे मॉक ड्रिल नव्हे, लोकांच्या संयमाची परीक्षा!” – प्रवाशांचा संताप
सकाळपासून जेट्टीवर थांबवून ठेवलेल्या प्रवाशांचा संताप उसळला. “आम्ही काय खलाशी आहोत का? सरकारी कारवाईच्या नावाखाली आम्हाला ओलीस धरता?” असा सवाल एका प्रवाशाने केला. “कामं बुडाली, कोर्टात अनुपस्थित राहावं लागलं, आर्थिक नुकसान झालं… या त्रासाची भरपाई कोण देणार?” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

महिला, वृद्ध आणि लहान मुलांना उन्हात ताटकळावं लागलं. कुठलीही सूचना, पर्यायी व्यवस्था न करता संपूर्ण जेट्टीवर बोट सेवा बंद ठेवण्यात आली, यावरही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
सजगता महत्त्वाची, पण नियोजनही हवं!
दहशतवादाचा धोका लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांची सजगता आवश्यकच आहे. मात्र त्यासाठी सामान्य जनतेला वेठीस धरून कारवाई केली जाणं, ही चूक नाकारता येणार नाही. मॉक ड्रिलसारख्या कारवायांसाठी पूर्वसूचना, पर्यायी वाहतूक व्यवस्था, व सामान्य नागरिकांसाठी मार्गदर्शन यावर भर देणं अत्यावश्यक आहे. अन्यथा ‘सुरक्षेच्या नावाखाली त्रास’ असा नागरिकांचा अनुभव वारंवार समोर येत राहील.