अनंत नारंगीकर
उरण : अलिबागजवळ समुद्रात घडलेल्या ‘तुळजाई’ बोट दुर्घटनेत करंजा येथील ३८ वर्षीय धीरज कोळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, याच धीरज यांचे वडील काशिनाथ कोळी यांचा ३६ वर्षांपूर्वी समुद्रातच वादळात बोट दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्यामुळे एकाच कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण करंजा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धीरज कोळी मागील दोन वर्षांपासून ‘तुळजाई’ मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून कार्यरत होते. ते आणि त्यांचा भाऊ सचिन दोघे मिळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, २६ जुलै रोजी ही बोट समुद्रात अपघातग्रस्त झाली. त्यानंतर सोमवारी सकाळी अलिबागच्या समुद्रकिनारी धीरजसह तिघांचे मृतदेह सापडले.
ही घटना धीरजच्या कुटुंबासाठी विशेषतः त्रासदायक ठरली आहे, कारण २३ जुलै १९८९ रोजी रायगडच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या वादळात अनेक मासेमारी बोटींना अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत सुमारे २०० पेक्षा अधिक मच्छीमार मृत्युमुखी पडले होते. यामध्ये धीरज यांचे वडील काशिनाथ कोळी यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या वेळी धीरज लहान होता आणि त्यांच्या कुटुंबात आई, भाऊ, बहीण यांच्यासह दुःखद काळ सुरू झाला होता. करंजा गावातील तब्बल २५ पेक्षा अधिक मच्छीमार त्या वादळात बळी गेले होते.
आज धीरजच्या निधनाने तोच दु:खद इतिहास पुन्हा उभा राहिला असून, गावकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाविषयी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. धीरजच्या पश्चात त्याची जबाबदारी आता भावावर येऊन पडली आहे.
या घटनेने मासेमारी करणाऱ्या समाजाच्या जिवनातील असुरक्षिततेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.