अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील मापगाव विभागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावले असून, भातशेती लावणीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. शेतकरी शेतात राब काढत शेवटच्या टप्प्यातील लावणीसाठी व्यस्त आहेत.
पावसाने दिलासा दिला असला तरी शेतीच्या अर्थकारणात मात्र अडथळे कायम आहेत. शेतमजुरांचा तुटवडा, वाढलेली मजुरी, खते व बियाण्यांचे वाढते दर, यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे, नवीन पिढी शेतीकामात फारसा रस न घेतल्याने अनेक शेतकऱ्यांना कुटुंबातील सदस्यांनाच शेतात उतरवावे लागत आहे.
सध्या या भागात शेतमजुरीचे दर पुरुषांसाठी ५०० रुपये, तर महिलांसाठी ३०० ते ४०० रुपये इतके आहेत. बैल नांगरणीसाठी १००० ते १२०० रुपये आणि ट्रॅक्टर अथवा टिल्लरने नांगरणीसाठी प्रती तास १२०० ते १५०० रुपये आकारले जात आहेत. त्यातच बियाणे आणि खते यांचे दर देखील गगनाला भिडले आहेत.
वाढते प्रदूषण, लहरी हवामान आणि आर्थिक अडचणीमुळे भातशेतीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. काही अंशी समाधान मिळाले असले तरी, शेती परवडत नाही, अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.