पोलिस निरीक्षक संदीप कहाळे यांची कौतुकास्पद कामगिरी
अमुलकुमार जैन
रायगड : जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील खांडा मोहल्ला येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सतत टोमणे मारल्याने रागात आलेल्या १८ वर्षीय नातवाने आपल्या ७२ वर्षीय आजोबांची निर्घृण हत्या केली. हत्या करून सगळं अनोळखी व्यक्तीने केल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र अवघ्या तीन तासांत म्हसळा पोलिसांनी या खुनाचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या.
मृत व्यक्तीचे नाव शौकत अली हुसेनमियाँ परदेशी (वय ७२) असून, आरोपी त्यांचा नातू मोहम्मद असगर अली परदेशी (वय १८) आहे. तो सध्या माणगावमधील द. ग. तटकरे विद्यालयात शिक्षण घेत होता. आजोबांकडून नेहमी ‘तू काही करू शकत नाहीस’, ‘कधीच सुधारणार नाहीस’ अशा प्रकारचे अपमानास्पद बोल ऐकावे लागत होते. तसेच आरोपीच्या आईकडे आजोबा वाईट नजरेने पाहत असल्याचा आरोप आरोपीने केला आहे. त्यामुळे तो वैतागलेला होता.
हत्या आणि बनाव
३१ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरातील सर्व सदस्य वरच्या माळ्यावर असताना आरोपीने खालच्या खोलीत झोपलेल्या आजोबांवर लोखंडी रॉडने डोक्यात वार केला आणि नंतर सुरीने गळा व मनगटावर वार करत हत्या केली. त्यानंतर एक अनोळखी इसम घरात घुसला होता, असे भासवून पोलिसांसमोर बनाव रचला.
पोलिसांचा संशय आणि तपास
घटनेची माहिती मिळताच श्रीवर्धनच्या उपविभागीय अधिकारी सविता गर्जे तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरु झाला. आरोपीच्या बोलण्यात विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे लक्ष केंद्रीत केले. त्याच्या अंगावरच्या खाजवून घेतलेल्या जखमा पाहून पोलिसांचा संशय वाढला. विश्वासात घेऊन पोलिसी पद्धतीने विचारणा केल्यावर अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलीस यंत्रणेचे कौतुक
संपूर्ण प्रकरणाचा तीन तासांत उलगडा केल्याने म्हसळा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या तपासात पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, पो. उपनिरीक्षक एडवले आणि त्यांच्या टीमने मोलाचे योगदान दिले.