पनवेल : पनवेलमध्ये पार पडलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लहान मुलांना हिंदी शिकवण्याचा विचार करतात, पण महाराष्ट्रात जे कामधंद्याच्या निमित्ताने येतात, त्यांना मराठी शिकवण्याचा विचारच करत नाहीत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” असं राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं.
या मेळाव्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते. भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरे म्हणाले, “अंगात ताकद नव्हती, पण तुमच्या आणि जयंत रावांच्या प्रेमाखातर आलो आहे. पावसाळा कमी झाला की पनवेलमध्ये स्वतंत्र सभा घेईन.” पुढे बोलताना त्यांनी आजार आणि राजकारणाची तुलना करत मिश्कील टोला लगावला. “पूर्वीचे आजार नाव घेऊन समोर यायचे. आता कोणता आजार झालाय हे समजतही नाही, तो ‘व्हायरल’ होतो. अगदी राजकारणही असंच आहे. तो त्या पक्षातून इथे, हा इथून तिथे – सगळेच व्हायरल!”
राज ठाकरे म्हणाले की शेकापच्या व्यासपीठावर मी दुसऱ्यांदा बोलतो आहे. यापूर्वी पाच वर्षांपूर्वी लोकसभा प्रचारासाठीही आलो होतो. ते म्हणाले, “जयंत राव म्हणाले फक्त मराठीत बोला. आणि मी म्हणतो की मराठीवरच बोला, मराठी माणसासाठी बोला.”
महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा आणि भूमिपुत्रांचा विचारच केला जात नाही, याचं विदारक स्वरूप म्हणजे रायगड जिल्हा असल्याचं राज ठाकरे म्हणाले. “इथे अनेकांची जमिनं गेली आहेत. व्यवहार करणारेही आपलेच आहेत, त्यामुळे ‘कुंपणच शेत खातंय’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरीही बरबाद होत आहेत. उद्योगधंद्यांमध्ये मराठी कामगारांना काम नाही आणि बाहेरच्यांची भरती सुरू आहे. या पक्षाचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष, पण त्याचा उपयोग तरी काय?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. “पंतप्रधान असोत वा गृहमंत्री – दोघंही गुजराती आहेत. ते अभिमानाने म्हणतात, ‘आम्ही हिंदी भाषिक नाही, आम्ही गुजराती आहोत.’ मग महाराष्ट्रातच हिंदीला एवढं प्राधान्य का? अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले. मी विचारतो, गुजरातमध्ये हिंदी आहे का? नाही. मग हे हिंदी महाराष्ट्रात का आणता? तिथे गेल्यावर तुम्हाला जमीनसुद्धा विकत घेता येत नाही. पण इथे मात्र तुमची जमीन गेली तरी तुम्हाला काही स्थान नाही,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
राज ठाकरे यांच्या परखड भाषणामुळे पनवेलमधील सभा गाजली. मराठी भाषेचा अभिमान आणि भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली.