सलीम शेख
माणगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माणगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं की, “दळणवळणाची सुविधा चांगली झाली, तर विकास कामांना गती येते.” यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आठव्यांदा पार पाडून विक्रम प्रस्थापित केला असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी काढले.

या कार्यक्रमात शिवसेनेचे प्रवक्ते अॅड. राजीव साबळे, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांच्यासह आठ नगरसेवक व समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेश व जाहीर सभा माणगाव येथील मातोश्री गंगुबाई शिंदे सीबीएसई स्कूलच्या मैदानावर पार पडली. याच वेळी अॅड. साबळे यांच्या नवीन नर्सिंग कॉलेजचे नामकरण व उद्घाटन समारंभही पार पडले.
कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, तुकाराम सुर्वे, जेष्ठ नेते मुश्ताक अंतुले, सरचिटणीस हनुमंत जगताप, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, महिला आघाडीच्या उमा मुंढे, दीपक जाधव, बाबूशेठ खानविलकर, मोहम्मद मेमन, विजयराव मोरे, अशोक भोपतराव, शेखरशेठ देशमुख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “राज्यात महायुती सरकार स्थापन असून, चांद्यापासून बांद्यापर्यंत विकासाचे स्वप्न घेऊन हे सरकार काम करत आहे. सत्ता उपभोगण्यासाठी नसून, ती जनतेच्या सेवेचे साधन असते. आगामी काळात विविध जाती-धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या मार्गावर वाटचाल करणार आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “माझ्या उपस्थितीत अॅड. राजीव साबळे यांच्या नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन झाले. राज्यात नर्सेसची मोठी मागणी असून, उच्च शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने या महाविद्यालयाला मान्यता मिळवता आली. माणगावमधील प्रलंबित विकास कामांवरही लवकरच तोडगा काढण्यात येईल. पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कामाला लागा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल.”
या वेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की, “अजितदादा पवार यांचे नेतृत्व महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातही वेगळ्या प्रकारचे आहे. पक्षातील जुने व नवीन कार्यकर्ते यांच्यावर अन्याय होणार नाही, याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून मी घेईन. माणगावातील अॅड. राजीव साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांचा पक्षात प्रवेश अत्यंत सकारात्मक आहे. केंद्राकडून दिघी औद्योगिक वसाहतीसाठी ४० हजार कोटींचा निधी मंजूर झाला असून, रायगडच्या विकासाला चालना मिळेल.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष केकाणे यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राचार्य डी.एम. जाधव यांनी केले.