पनवेल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच शेकापच्या मेळाव्यात रायगड जिल्ह्यात डान्स बार वाढत असल्यावर टीका करताना पनवेलमधील डान्सबारांचा विशेष उल्लेख केला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर काही तासांतच पनवेलमधील कोनगाव येथे असलेल्या ‘नाईट राईड’ डान्सबारवर मनसे कार्यकर्त्यांनी मध्यरात्री तोडफोड केली होती. या प्रकरणात पनवेल तालुका पोलिसांनी ८ जणांना अटक केली होती. अटकेतील या मनसैनिकांना न्यायालयाने आता जामीन मंजूर केल्याने त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणातील इशाऱ्यानंतर घडलेल्या या घटनेने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या तोडफोडप्रकरणी मनसेच्या सुमारे २० ते २५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्यांना पनवेल न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
दरम्यान, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात डान्सबारांची संख्या लक्षणीय असून, पोलिस प्रशासनाने जर यावर तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर मनसेतर्फे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा मनसेचे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पनवेलमधील डान्स बारमुळे तरुण पिढी अधःपतनाकडे जात असल्याचे नमूद करत या बारवर कठोर कारवाई होण्याची गरज व्यक्त केली होती. त्यांच्या भूमिकेनंतरच स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी तातडीने कारवाईचा मार्ग पत्करला.