• Tue. Aug 5th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खोपोलीत आरडीसीए आयोजित पंच शिबिरात तज्ज्ञांचे मार्गदर्शन; ५० पंचांचा उत्साही सहभाग

ByEditor

Aug 4, 2025

क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग :
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (RDCA)च्या वतीने दिनांक २ ऑगस्ट रोजी खोपोली येथे क्रिकेट पंचांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर महाराजा बँक्वेट हॉलमध्ये पार पडले असून, आयोजनासाठी आरडीसीएचे उपाध्यक्ष यशवंत साबळे यांनी सहकार्य केले.

या शिबिरात माजी रणजीपटू आणि बीसीसीआयचे विद्यमान पंच हर्षद रावले, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच राजन कसबे तसेच क्रिकेट नियमांचे जाणकार नयन कट्टा यांनी उपस्थित पंचांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सुमारे ५० प्रशिक्षार्थी पंचांनी या शिबिरात सहभाग घेतला.

शिबिर १०० दिवसांचे असून, त्यात ऑनलाइन प्रशिक्षण व प्रत्यक्ष कार्यशाळांचा समावेश आहे. आगामी २३ ऑगस्ट रोजी पंच पॅनलची परीक्षा घेण्यात येणार आहे.

काशी क्रिकेट अकॅडमीच्या टर्फ ग्राउंडवर विविध क्रिकेट नियमांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यात एमसीसी क्रिकेट लॉज, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एकदिवसीय, टी-२० व मल्टी डेज सामन्यांतील बदलते नियम समजावून सांगण्यात आले.

आरडीसीएचे उपाध्यक्ष यशवंत साबळे व सदस्य कौस्तुभ जोशी यांनी माहिती दिली की, गतवर्षी मुला-मुलींच्या सर्व वयोगटांतील सुमारे ३२५ सामन्यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. यावर्षी ५०० हून अधिक सामन्यांचे आयोजन करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षांखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील १५ दोनदिवसीय सामने देखील रायगड जिल्ह्यात खेळवण्यात आले होते. या सर्व सामन्यांमध्ये रायगड जिल्ह्यातील प्रशिक्षित पंचांनी मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमासाठी आरडीसीएचे उपाध्यक्ष यशवंत साबळे, सदस्य कौस्तुभ जोशी, ॲड. पंकज पंडित, शंकर दळवी, विनोद सोळंकी तसेच प्रशिक्षक हर्षद रावले, राजन कसबे आणि नयन कट्टा उपस्थित होते. यशवंत साबळे यांनी आपला महाराजा बँक्वेट हॉल विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल आरडीसीएने त्यांचे विशेष आभार मानले.

रायगड जिल्ह्यात अधिकाधिक प्रशिक्षित पंच घडवण्यासाठी आरडीसीए कटिबद्ध आहे, असे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदिप नाईक यांनी स्पष्ट केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!