माणगाव-पुणे मार्गावरील अपघातात ४० वर्षीय पुरुषाचा मृत्यू, १७ वर्षीय मुलगी जखमी
सलीम शेख
माणगाव: माणगाव तालुक्यातील निजामपूर बस स्थानकाजवळ शनिवारी (दि. ४ ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक १७ वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. मारुती सुझुकी बलेनो गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत हे दुर्घटनाग्रस्त झाले.
अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, ती पोलिसांनी तत्काळ नियंत्रणात आणली.
प्राथमिक माहितीनुसार, पुण्याहून माणगावकडे येणारी एमएच-१२ एक्सटी ४४३७ ही बलेनो कार क्रिशांत विजय उबाळे (वय १९, रा. पिंपळोली, ता. मुळशी, जि. पुणे) चालवत होता. निजामपूर येथील शिव हॉटेलजवळ रिक्षा स्टँडजवळ सलीम मोहम्मद चाफेकर (वय ४०, रा. निजामपूर) यांना गाडीने जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या चाफेकर यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात प्रगती बबन सुतार (वय १७, रा. बामणगाव, ता. माणगाव) ही मुलगी देखील जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातात दोन रिक्षा आणि कारचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वाहनचालक क्रिशांत उबाळे याच्यावर भा.दं.वि. कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.