प्रतिनिधी
अलिबाग : कोथरूड – पुणे येथील सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्था आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये विलीनीकरण करण्याचा ठराव आदर्श पतसंस्थेच्या २७व्या वार्षिक सभेत मंजूर करण्यात आले.
आदर्श नागरी सहकारी संस्थेची २७वी वार्षिक सभा आदर्शचे अध्यक्ष अभिजित सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. २) क्षात्रैक्य माळी समाज हॉल , कुरुळ-अलिबाग येथे पार पडली. या सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या पिंपळभाट व पोयनाड या दोन शाखांसाठी स्वामालकीच्या जागा खरेदी करणे, रामराज शाखेसाठी यापूर्वी खरेदी करण्यात आलेल्या मोकळ्या प्लॉटवर बांधकाम करून तेथे रामराज शाखेचे कामकाज सुरू करणे, सभासदांना ११ टक्के लाभांश देणे हे ठराव देखील या सभेत मंजूर करण्यात आले.
आदर्श तर्फे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग व जिल्हा पोलिस कल्याण निधिला प्रत्येकी एक लाख रुपये मदतीचे धनादेश देण्यात आले. नाना शंकर शेठ यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने संस्थेमध्ये घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे परितोषिक वितरण करण्यात आले. या निबंध स्पर्धेत रेवस शाखाधिकारी कौस्तुभ म्हात्रे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. चेंढरे शाखाधिकारी रेश्मा पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. कुरुळ शाखाधिकारी प्रियांका जगताप-वाळंज व चोंढी शाखा सहशाखाधिकारी श्रीराज पावशे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. या निबंध स्पर्धेचे परीक्षण सूएसो हायस्कूल, कुरुळच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी केले. संस्थेचे ज्येष्ठ सभासद सुभाष विठ्ठल पानसकर यांनी वयाच्या ७३व्या वर्षी २३ गड व किल्ले यांची ट्रेकिंग केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सभेपूर्वी याच ठिकाणी सभासद प्रशिक्षण आयोजित केले होते. सहकारी संघ पुणेचे एस. बी. वटाणे यांनी सभासद यांची कर्तव्य, जबाबदारी याविषयी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी संस्थेतर्फे बँकिंग व सहकाराचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा मनोदय आपल्या मनोगतात व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी संस्थेची आर्थिक स्थिती सभासदांसमोर सादर केली. या सभेला सुरेश पाटील, अभिजीत पाटील, कैलास जगे, अनंत म्हात्रे, सतीश प्रधान, ॲड. आत्माराम काटकर, विलाप सरतांडेल, ॲड. रेश्मा पाटील, ॲड. वर्षा शेठ, भगवान वेटकोळी, रामभाऊ गोरीवले, महेश चव्हाण, श्रीकांत ओसवाल , संजय राऊत सी. ए., डॉ.मकरंद आठवले हे संचालक उपस्थित होते. आभार प्रदर्शन संस्थेचे तज्ज्ञ संचालक डॉ. मकरंद आठवले यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्याधिकारी उमेश पाटील यांनी केले.