अनंत नारंगीकर
उरण : देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या आणि मुंबई-नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर पावसाळ्याच्या पहिल्याच वर्षी खड्डे पडल्याने वाहनचालक आणि प्रवासी नागरिक आश्चर्यचकित झाले आहेत. देशातील सर्वात मोठ्या सागरी पूलांपैकी एक असलेल्या या सेतूवर अवघ्या १८ महिन्यांत झालेली ही दुर्दशा ही खेदजनक बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
अटल सेतू, अर्थात मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (MTHL), सुमारे २२ किलोमीटर लांब असून त्यातील १६ किलोमीटर समुद्रावर, तर उर्वरित भाग जमीनमार्गावर आहे. १८ हजार कोटी रुपयांचा खर्च करून उभारलेला हा प्रकल्प देशाच्या प्रगत पायाभूत सुविधांचा भाग मानला जातो. मात्र, याच सेतूवर पावसाळ्यात खड्डे पडल्याचे चित्र पाहायला मिळत असून, अनेक ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

स्थानिक कामगारांच्या माहितीनुसार, सध्या खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पावसाळ्यात कोल्ड मिक्स, तर इतर हंगामात हॉट मिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या खराब कामगिरीबद्दल ठेकेदार कंपनीवर २० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, देशाच्या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या आणि अभिमानाने उद्घाटन झालेल्या अशा प्रकल्पात केवळ १८ महिन्यांतच खड्डे पडणे हे प्रशासन आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, तसेच जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.